

नागपूर- सुमारे 140 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया भारतीय राज्यघटनेने साध्य करुन दाखविली. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील 10 लाख घरात शासन पोहचविणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत घर घर संविधान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे पुढे म्हणाले, राज्यघटनेची उद्देशिका घराघरात पोहचविण्याचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातून व या दीक्षाभूमीतून होत आहे. लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आहे. यात रमाई आवास घरकुल, स्वाधार योजना, तृतीय पंथीयांना ओळखपत्र वाटप, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील जी काही महत्वाची ठिकाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत ती स्थळे नव्या पिढीला शक्तीस्थळासारखी आहेत. या स्थळांचे जतन शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. यात शांतीवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेला 2 कोटी 47 लाख 67 हजार, कामठी येथील ओगावा सोसायटीला 5 कोटी 94 लाख 88 हजार, गुरुचरण दास स्वामी मठ पंचकमिती नागपूर यांना 52 लाख 31 हजार, प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान नागपूर यांना 7 कोटी 2 लाख रुपये तर स्टँडअप इंडिया स्किम अंतर्गत मेघा इंटरप्रायजेसच्या श्रीमती माया मेश्राम यांना 5 लाख 3 हजार रुपयांचे धनादेश पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.