

Praful Patel
नागपूर : राज्यात आपण महायुतीच्या माध्यमातून भक्कम बहुमताने सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडून आले तरी पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण, केवळ कडक, टाईट कपडे घालून मिरवू नका, पक्ष वाढवा, निवडणुकीत जागा किती मागायच्या ते मी चर्चेत ठरवेन.
या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांची आज शुक्रवारी चांगलीच कान उघाडणी केली. ते म्हणाले, मी सांगतो कुणी किती क्रियाशिल सदस्यांची नोंदणी केली ती आकडेवारी आपल्याकडे आहे. तुम्हाला जिल्ह्यात १० लोकं सापडत नसतील आणि पक्षाचे बेसिक कामही करात नसल्याने मग पक्ष कसा वाढणार? आम्ही तुमच्या निष्ठेवर कसा विश्वास ठेवायचा अशी विचारणा त्यांनी केली.
आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर आणि अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज नागपुरातील परवाना भवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पटेल यांनी उघडपणे सर्वांना सुनावले. १० क्रियाशिल सदस्य करण्यासाठी एक पुस्तिका भरून द्यायची आहे. फक्त ११० रुपयांचा खर्च येतो. आपले एवढे पैसे दररोज चहापानात खर्च होतात. आता तेही खर्च करण्याची तसदी घेतली जात नाही. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. एवढे साधे काम पदाधिकारी करू शकत नसतील तर तुमची पक्षावरची निष्ठा किती आहे. हे दिसून येते असेही पटेल यांनी सुनावले.
यावेळी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, संजय खोडके, शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर आदी अनेक नेते,पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.