

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार (३० मार्च) रोजी हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी व देशाचे केंद्रस्थान असलेल्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत़. सकाळी ८.३० वाजता विशेष विमानाने त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाच तासांच्या या भेटीत रेशीमगबाग येथील डॉ़ हेडगेवार स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी येथे भेट, माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी व सोलार डिफेन्स, एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील़.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रतिपदा’ कार्यक्रमानिमित्त रेशीमबाग येथील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिरला भेट देऊन प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करतील यानंतर ते दीक्षाभूमी येथे जाऊन तथागत गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये ‘अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स’साठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि ‘लोइटरिंग म्युनिशन’ चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.