

नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर एका पार्सलचा जोरदार आवाज आणि स्फोट झाल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. वाशीम येथील एका महिलेने तिच्या मुंबई येथे राहणाऱ्या भावाला एक पार्सल पाठवले. यात शेतातील अथवा आसपासची जनावरे पळवून लावण्यासाठीचे हे फटाके यात होते. तिने एका खाजगी कंपनीद्वारे पाठवलेले हे पार्सल तातडीने पाठवायचे असल्याने विमानाद्वारे ते पाठविण्याचा निर्णय झाला.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईच्या एका फ्लाईट मधून हे पार्सल जाणार होते. मात्र ते ठेवताना किंवा फेकताना त्यातीलच काही फटाके फुटल्याने जोरदार आवाज आला. विमानतळ कार्गो परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्थाही सतर्क झाली. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने विमानतळ सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र यात धोकादायक असे काहीही नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली पुढील तपास सोनेगाव पोलीस करीत आहेत.