

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या पत्रकार प्रशांत कोरटकरचा अद्यापही पोलिसांना शोध लागलेला नाही. शिवभक्तांची तातडीने कारवाईच्या मागणीसाठी एकीकडे नागपुरात स्कूटर रॅली निघाली. दुसरीकडे प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी कुटुंबीयांना सातत्याने धमकी दिली जात असून कोणाला काही कमी जास्त झाल्यास इंद्रजीत सावंत हेच जबाबदार राहतील अशी तक्रार पोलिसात केली आहे.
शनिवारी दुपारी त्यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशन गाठले व पोलिसात ही तक्रार दिली. कोल्हापूर पाठोपाठ नागपुरातही प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईसाठी सातत्याने विविध संस्था, सकल मराठा समाज व शिवभक्त आक्रमक झालेले आहेत. दुसरीकडे बेपत्ता प्रशांतचा थांगपत्ता लागलेला नसताना कुटुंबीयांना नाहक त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. आता पोलीस ही तक्रार दाखल करून घेणार असून त्यांना नेमक्या कोणत्या फोन नंबरवरून, सोशल मीडियातून ही धमकी आली त्याचा शोध घेणार आहेत.
प्रशांत कोरटकर यांचे फोन अद्यापही नॉट रिचेबल असून पोलिसांना त्यांचा सुगावा लागलेला नाही. दुसरीकडे कुटुंबीयांशी देखील त्यांचा संपर्क झाला नाही अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूने तक्रारी दाखल झाल्याने पोलीस नेमकी कुठली कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशातील इंदूर, बालाघाट दिशेने गेल्याचे कळताच पोलिसांची तीन पथके त्याच्या शोधात आहेत. बेलतरोडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा या संदर्भात नवा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे आज शनिवारी नागपुरातील शिवभक्तांनी स्कूटर रॅलीचे आयोजन केले. शिवतीर्थ गांधी गेट येथून निघून संविधान चौकापर्यंत ही स्कूटर रॅली पोहोचली. महापुरुषांचा सातत्याने अपमान खपवून घेतला जाणार नाही ठोस कारवाई करा अशी घोषणाबाजी करण्यात आली. लवकरात लवकर कारवाईसाठी शिवभक्तांनी स्वाक्षरी अभियान देखील सुरू केले आहे.