

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
काश्मिरातील पहलगाम येथील मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यातील पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध, आंदोलनाची हाक दिली असून दहशतवाद्यांना ठोस उत्तर देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे उन्हाळी सुटीत मौजमजेसाठी गेलेले, सुखरूप बचावलेले पर्यटक आता घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील पृथ्वीराज वाघमारे, मनीषा वाघमारे आणि त्यांचे भाऊ, मुले असे सात जणांचे कुटुंब सध्या श्रीनगरमध्ये हॉटेलमध्ये सुखरूप असले तरी रस्ता मार्ग दरड कोसळल्याने तो बंद आहे. रेल्वे तिकीट रद्द करून त्यांनी सव्वा लाख रुपये विमानाच्या तिकिटासाठी भरले पण आज विमान उपलब्ध नाही. आता त्यांना 24 एप्रिलचे तिकीट मिळाले आहे. या या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातून आलेले आहेत. पर्यटक सुखरूप असले तरी त्यांना तातडीने सरकारकडून विमान उपलब्ध व्हावे अशी त्यांची मागणी आहे. इकडे आई, भाऊ आणि इतर सारे नातेवाईक लवकर घरी या अशा चिंतेत आहेत. स्थानिक हेल्पलाइन नंबरवर जिल्हा प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधला असता त्यांनीच आम्हाला एअरलाईन्सवाल्यांशी बोलण्याचा उलट सल्ला दिल्याचे वास्तव पृथ्वीराज वाघमारे यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या कुटुंबातील सदस्य पहलगामला जाऊन परतले, यानंतर ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला, फोटो घेतले, मॅगी देखील खाल्ली असेही सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला, मात्र काहीही उपयोग झालेला नाही. जरीपटका परिसरातील तिघे थोडक्यात बचावले... दरम्यान, नागपूरचे जरीपटका परिसरातील रुपचंदानी कुटुंबातील तीन पर्यटक सुखरूप आहेत.
प्रसंगावधान राखून जीव मुठीत धरून ते पळत सुटले म्हणून बचावले. जीवाचे पायावर गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा होते. त्यांनी परस्परांना सांभाळत मार्ग शोधला. आता तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने मंगळवारी रात्री स्पष्ट केले.