

Pahalgam Terrror Attack
नागपूरः मुळात नको असलेली देशाची फाळणी झाली. मात्र आमचे मन पाकिस्तानमध्ये कधीही रमले नाही. धर्मांतर करा अन्यथा देश सोडा अशी सातत्याने धमकी मिळत होती. शेवटी आम्ही भारतात आलो, आम्हाला आता पाकिस्तानात परत जायचे नाही अशी भावना नागपुरातील सिंधी बांधवांनी व्यक्त केली आहे.
उत्तर नागपुरातील जरीपटका वस्तीत त्यांची मोठमोठी घरे, व्यवसाय आहे. आजही 721 सिंधी बांधव नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या साडेसहा वर्षात 756 पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व मिळाले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा सीएए 2019 च्या माध्यमातून आम्हाला लवकरच न्याय मिळेल असा विश्वास, या सिंधी बांधवांच्या नागरिकत्वासाठी सातत्याने लढा देणारे सिंध मुक्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विजय केवलरामानी यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
फाळणीपासून सिंधी बांधव संधी मिळाली तेव्हा भारतात आले आहेत. 1949 साली नागपुरात आलेले, भारतीय नागरिक झालेले प्रा. केवलरामाणी यांचा इतरांच्या नागरिकत्वासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे. 1967 व 1971 मध्ये जरीपटका येथे विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
1980 मध्ये 450 सिंधी बांधवांना नागरिकत्व मिळाले. जरीपटका या भागात सरकारने विकास कामेही केली. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकाराने सिंधी बांधवांना त्यांच्या घराचे मालकी हक्काचे काही पट्टे देखील प्रातिनिधिक स्वरूपात याच भागात देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारने बुधवारी दिले. ही मुदत शुक्रवारी संपली. पोलीस प्रशासनाकडून पाकिस्तानातील अल्प मुदतीच्या व्हिसावर आलेल्या, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा स्थितीत आम्हाला देखील देश सोडावा लागू शकतो का ही भीती अनेकांच्या मनात आहे.
जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी ती निवेदन देत व्यक्त देखील केली. मात्र आम्ही कधीही स्वतःला पाकिस्तानी समजले नाही. मुळात आम्ही असुरक्षित असल्याच्या भावनेतूनच भारतात आलो. आता कुठल्याही स्थितीत भारत सोडणार नाही. अखंड भारत व्हावा हीच इच्छा मनात ठेवून सिंध मुक्त संघटन स्थापन करण्यात आले. गेले 53 वर्ष अखंड भारतासाठी आमचा लढा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीच सिंधू जल करार रद्द करा अशी मागणी सिंध मुक्त संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती हे विशेष.