नागपूर : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या सहा वर्षांत कुत्रा चावल्याच्या 30 लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे, तर 2021 ते 2023 या काळात रेबिजमुळे 30 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर चिंता व्यक्त करत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी स्वरूपात माहिती दिली. मुंबई, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑगस्ट 2024 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राणी जन्म नियंत्रण आणि अँटी-रेबीज लसीकरण कार्यक्रमांची तीव्रता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राणी जन्म नियंत्रण कायदा 2023 नुसार राज्यभर आदेश लागू केले जात आहेत, असे शिंदे यांन सांगितले.
भरपाईबाबत सध्या विचार नाही
रेबीजमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याबाबत आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास झालेल्या विलंबाबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले की, नुकसान भरपाईबाबत सध्या विचार नाही. मात्र कुत्रा चावल्यास मात्र सरकारी दवाखान्यात अँटी रेबीज लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यावर सरकारचा भर आहे.