

नागपूर- देशासमोर असलेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता 10 मे पासून पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट म्हणजेच फोन पे, गुगल पे, पेटीएम, डेबिट क्रेडिट कार्ड असे कुठलेही ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत अशी भूमिका विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जयस्वाल यांनी व्यक्त केली होती.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील आमची रक्कम गोठविली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशभरात डिजिटल व्यवहार कोविड काळानंतर मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पेट्रोल पंप मालक, चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणात संपूर्ण बँक खाती गोठविण्यात आली आहेत. संबंधित खात्यातील रक्कम गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही.
दररोज वर्दळीच्या पेट्रोल पंपावर हजारो डिजिटल व्यवहार होतात. अशावेळी ग्राहक कुठल्या,कुणाच्या खात्यातून पैसे आम्हाला पाठवत आहेत, त्यांचा इतिहास काय आहे या विषयी माहिती घेणे पेट्रोल पंप चालकाना शक्य नाही असे स्पष्ट केले होते. भविष्यात राज्यभरात देखील हाच निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले होते.,