

जुनी पेंशन योजना लागू न करणे तसेच अन्य न्याय मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.9) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी क्रांती दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर निदर्शने केली. यावेळी आगामी निवडणुकीत विरोधात मतदानाचा इशारा देण्यात आला. राज्य शासनाविरुध्द तीव्र नारे निदर्शने करण्यात आली तसेच जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत जुन्या पेंशन प्रमाणे लाभ मिळत नाही. तोपर्यंत संघर्ष व आंदोलन सूरुच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विद्यमान सरकारने जुनी पेंशन प्रमाणे लाभ न दिल्यास येत्या निवडणुकित सरकारविरुध्द मतदान करण्याचाही निर्णय गेट मिटिंगमध्ये घेण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गोपीचंद कातुरे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, निरंजन पाटील, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणी व संघटन सचिव सुजित अढाऊ व किशोर भिवगडे, लेखावर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष विजय बुरेवार, जयंत दंढारे, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे सुभाष पडोळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रकाश भारव्दाज, आरोग्य कर्मचारी संघटेनेच्या महिला संघटिका कविता बोंदरे, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अमोल गोडबोले, मंजुषा धारगावे आदिंनी केले. आंदोलनात 450 ते 500 जिल्हा परिषचे कर्मचारी सहभागी झाले होते यात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.