

नागपूर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि भटक्या विमुक्त (व्हीजेएनटी) समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी तसेच ७ ऑगस्ट 'मंडल दिनाचे' औचित्य साधून 'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने संपूर्ण विदर्भात 'ओबीसी मंडल यात्रा' काढण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून या यात्रेची सुरुवात होणार असून ती विदर्भातील ११ जिल्ह्यांत जनजागृती करत ९ ऑगस्ट 'क्रांती दिनी' चंद्रपूर येथे भव्य महासभेने संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी दिली.
मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींची जातिनिहाय जनगणना, आरक्षणाचे संरक्षण आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी जनजागृती हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यात्रेदरम्यान विदर्भातील ओबीसी समाजाला संघटित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून सुरू होणारी ही यात्रा नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरसह विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत पोहोचणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सभा, कोपरा सभा, स्वागत समारंभ आणि ओबीसी बांधवांशी थेट संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ७ ऑगस्ट 'मंडल दिनी' गोंदिया येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून मंडल आयोगाच्या विचारांचा जागर केला जाणार आहे.
या यात्रेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात एकजूट निर्माण करून हक्कांच्या लढ्याला बळ देण्याचा निर्धार यात्रेद्वारे व्यक्त केला जाणार आहे.
विदर्भातील जनजागृतीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ९ ऑगस्ट 'क्रांती दिनी' चंद्रपूर येथे भव्य महाअधिवेशनाने यात्रेचा समारोप होईल. या महासभेतून ओबीसी समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा, भूमिका आणि रणनीती जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी आवाहन करताना सांगितले की, "७ ऑगस्ट हा मंडल दिन ओबीसी समाजाच्या हक्कांची जाणीव करून देणारा दिवस आहे. मंडल आयोगाच्या तत्त्वांचे संरक्षण, आरक्षणाचे संवर्धन आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रत्येक ओबीसी बांधवाने या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."