

नागपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. संविधान चौक येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण निमित्ताने ते बोलत होते.
डॉ. तायवाडे म्हणाले, भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर ते जातीला देता येते. त्यामुळे डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. मात्र, विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन हे राजकीय आरक्षणासाठी असल्याची भूमिका मांडली आहे. नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे, त्यांच्या या भूमिकेचे ओबीसी महासंघ स्वागत करत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले आहे.