

नागपूर - केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यकर्त्यांना म्हणाले आगामी महापालिका निवडणुकीत कुणाला दारू पाजू नका, भाड्याचे लोक आणू नका', सावजीची मेजवानी चालेल, पण आपल्या कामाच्या भरवशावर मत मागा, नागपूर महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने नागपुरात आपण कोट्यवधींची विकास कामे केली आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी नागपुरी शैलीत बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भाजयुमोच्या नागपुरातील मेळाव्यात त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला. आपण चांगले रस्ते, उड्डाणपूल, पायाभूत सुविधा, २४ तास पाणी असे चांगले काम केले आहे. ही तर सुरुवात आहे आणखी खूप काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेत जाऊन महापालिकेची निवडणूक लढू या. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करण्याची गरज आहे. मी मंचावर बसलेल्या सगळ्यांना (भाजप नेत्यांना) सांगतो, कुणालाही दारू पाजू नका. कुणाला सावजी चारायचे असल्यास हरकत नाही. मी शाकाहारी आहे परंतु अनेकांना सावजी मटण खूप आवडते. त्यामुळे सावजी देण्यात हरकत नाही, असेही गडकरी म्हणाले.
एक सुंदरी, पन्नास जण म्हणतात माझेच जमवा...!
आधी एक फुल, दोन माली असे म्हटले जात होते. आता तब्बल पाच हजार इच्छुकांनी नागपूर महापालिकेच्या विविध प्रभागांसाठी तिकीट मागितले आहे. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की एक सुंदरी आहे आणि ५० जण म्हणतात, माझेच तिच्यासोबत जमवा. प्रत्येक व्यक्ती मीच चांगला असल्याचे सांगतो. एकप्रकारे हे जणू स्वयंवरच आहे.
एकच खुर्ची आहे आणि त्यावर एकच जण बसू शकतो. यामुळेच निवडणुकीत प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा प्रयत्न केला जाईल. गडकरी म्हणाले, मी तिकीट वाटताना जात, पात, धर्म पाहणार नाही. मी स्वतःही जात-पात मानत नाही. संपूर्ण नागपूर माझे घर आहे. भाजपच्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नागपुरात आल्यानंतर मला पाच हजार जणांनी तिकीट मागितल्याचे सांगण्यात आले. त्यावर मी म्हणालो, आता तर कपडे फाडण्याची वेळ आली आहे. समोरचा व्यक्ती म्हणतो, गडकरी साहेब, तुमच्या वेळी आम्ही काम केले, आता आमचे कसे? असेही गडकरी म्हणाले.