

नागपूर: भाजप पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. आज तेच जुने, निष्ठावान कार्यकर्ते घर की मुर्गी दाल बराबर... झाले आहेत. आज बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो. मात्र लक्षात ठेवा ज्यांनी पक्ष वाढविला, ते नाराज झालेत तर पक्ष एका दिवसात खाली येईल; अशा शब्दात केंद्रीय महामार्ग मंत्री भाजप नेते नितीन गडकरी यांनी पक्षातील आयाराम गयाराम यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
अर्थातच त्यांचा हा रोख माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत नेमका कुणाकडे होता याविषयीची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच इतर विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम निमित्ताने गडकरी बोलत होते.
कळमेश्वर परिसरात डॉ. राजीव पोतदार सारखा उत्तम कार्यकर्ता पक्षाला मिळाला. त्यांना मी नेहमी सांगायचो, दवाखान्याकडे लक्ष द्या मात्र त्यांनी दवाखाना बाजूला ठेवला आणि गावभर फिरून जनतेची कामे सुरू ठेवली. पक्षाच्या धोरणानुसार प्रामाणिकपणे जनतेची कायम सेवा केली. तो प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची कदर करा, भविष्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोतदार यांचे भविष्याची काळजी घ्यावी, ते घेतील असा विश्वासही गडकरी यांनी शेवटी आवर्जून व्यक्त केला.
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, आमदार डॉ आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार अशोक मानकर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सावनेर कलमेश्वर विधानसभा मतदारसंघात डॉ पोतदार यांना आमदार होता आले नाही. मात्र डॉ आशिष देशमुख इकडून तिकडे गेल्यावरही आमदार झाले ही चर्चाही यानिमित्ताने गडकरी यांच्या भाषणानंतर रंगली.
आता गेल्या काही दिवसात उघड नाराजी घेणारे, स्पष्टवक्ते नितीन गडकरी यांचा रोख पक्ष वाढीच्या भानगडीत पक्षनिष्ठा बाजूला राहिली याकडेच असल्याने पक्षातही चर्चेला जोर आला. माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनसंघापासून भाजप वाढविण्याचे काम जुन्या कार्यकर्त्यांनीच केले यात गडकरी चुकीचे बोलले नाही असे स्पष्ट केले. दुसरीकडे पक्षाचा विकास नव्या, जुन्या साऱ्यांनीच केला असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.