

Nitin Gadkari 69th Birthday
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी (दि. 27) 69 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कांचन गडकरी आणि कुटुंबीयांनी औक्षण केले.
दिवसभर त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी अभिष्टचिंतन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय वर्तुळातील मान्यवरांनी गर्दी केली.
तर दुसरीकडे गेले अनेक दिवस काम रखडलेल्या महाल परिसरातील गडकरी वाड्याचे देखील काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाल येथील वाड्यात अर्थात वाड्याच्या जागी तयार झालेल्या सुसज्ज, टोलेजंग इमारतीत राहायला जाणार असल्याची माहिती आहे.
मध्यंतरी याच इमारतीत वाड्यासारख्या देखण्या अंतर्गत सजावटीचे फोटो, व्हिडिओ देखील व्हायरल झाले. खूप चर्चेत आले. अतिशय गोपनीय पद्धतीने, कौटुंबिक सोहळ्यात या ठिकाणी पूजा, धार्मिक विधी पार पडले.
यामुळेच गडकरी यांच्या वाढदिवस कार्यक्रमानंतर आता वर्धा रोडवरून गडकरी कुटुंबीय आपल्या परंपरागत महाल येथील वाड्यात अर्थात वाड्याच्या जागी उभ्या राहिलेल्या सुसज्ज इमारतीत वास्तव्यास जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळेच सध्या बाहेरील संरक्षक भिंत आणि इतर खोळंबलेली कामे जोरात सुरू असल्याचे दिसत आहे.