

नागपूर- समाजातील वंचित घटकांची विविध माध्यमातून ज्यांनी सेवा केली त्याची दखल घेण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे. त्यांना आणखी पुढे जाण्याचा उत्साह कायम राहिला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले.
२१ व्या शतकातील भारत पुढे नेताना राज्यातील विविध भागात होत असलेल्या परिषदांचे आयोजन हे शासनाच्या योजनांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या परिषदांतून निघणारी तथ्ये, माहिती ही विकसित भारत घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारी आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविताना याची निश्चितच दखल घेण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर येथे विवेक विचार मंच, बार्टी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन रविवारी महसूल मंत्री तथा पालकमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे,महानाग भंतेजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावर यांच्यासह सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक महेश पोहनेरकर यांनी केले. सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार सागर शिंदे यांनी मानले.
विवेक विचार मंचातर्फे दिला जाणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. रेखा बहनवाल, ॲड .संदीप जाधव, पश्चिम महाराष्ट्र राजेंद्र गायकवाड, येथील चंद्रकांत काळोखे, आनंद लोखंडे, विकास अवसरमल, नागेश पाटील, प्रताप निंदाणे, रेखा कांबळे, खुशाल ढाक यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.