

Bihar election result impact
नागपूर: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेला अभूतपूर्व विजय हा देशाच्या राजकीय परिवर्तनाचे प्रतीक असून २०४७ पर्यंत देशात एनडीए सत्तेत राहील. 2029 साली काँग्रेस सर्वात छोटा पक्ष राहील, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
बावनकुळे म्हणाले की, बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाला पसंती दिली आहे. इतिहासात कधीही न मिळालेलं इतकं मोठं बहुमत एनडीएला मिळाले. जनता विकास, विश्वास आणि विकसित भारताच्या संकल्पनेसोबत उभी राहिली. या विजयाने देशभरातील सामान्य मतदाराचा विकासाकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे आणि राहुल गांधींचे नेतृत्व हतबल झाले आहे. “काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही. समाजात तेढ निर्माण करणे हा त्यांचा एकमेव हेतू दिसतो. २०२९ मध्ये काँग्रेस देशातील सर्वात छोटी पार्टी बनेल,” असा दावा त्यांनी केला. निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. हीच त्यांची पारंपरिक सवय झाली आहे.
विरोधकांकडे कोणताही रोडमॅप नाही. विरोधकांनी केवळ मतदार याद्या आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले.आज देश बदललेला आहे. ६५ वर्षे लोकांनी काँग्रेसला जात-धर्माच्या आधारावर मतदान केले. मात्र भाजपने विकासाचा अजेंडा दिला आणि देश आज विकासाच्या मार्गावर ठामपणे चालला आहे. २०४७ पर्यंत केंद्र आणि राज्यात एनडीए सत्तेत राहील, यात शंका नाही.