

Nagpur Municipal Corporation Election
नागपूर : महायुतीचे जागावाटप सूत्र ठरल्यावर उपराजधानीत एकीकडे भाजप, शिवसेना एकत्रित तर राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या टप्प्यात स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. तर दुसरीकडे तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा संताप आता भाजप शिवसेनेपाठोपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रकर्षाने उघड झाला आहे.
चक्क तिकीट विकल्याचे आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस गणेशपेठ कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. प्रदेश पदाधिकारी बजरंगसिंग परिहार यांच्या एका कार्यकर्त्याला तिकीट मिळाले म्हणून त्यांनी वाजतगाजत फॉर्म भरला. मात्र, ऐन वेळेवर चारही उमेदवार पॅनल देणाऱ्या दुसऱ्यानेच एबी फॉर्म ताब्यात घेतल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते.
मंगळवारी (दि.३०) दुपारी अचानक कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावेळी टीव्ही आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली. महाविकास आघाडीतही बिघाडी पाहायला मिळत आहे. काँग्रेस शहरातील सर्व 151 जागा लढवित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 70 जागा लढणार आहे. ठाकरे शिवसेनेने देखील स्वतंत्रपणे पन्नासपेक्षा अधिक जागा लढण्याचे ठरविले आहे. आज मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी 3 पर्यंत आहे.