

नागपूर: मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागले पाहिजे, विशेषतः विधिमंडळात वावरताना अधिक काळजी घेणे अपेक्षित असते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनामुळे महायुती सरकारची प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये आणि जनतेमध्ये मलीन होत आहे, त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी, अशा परखड शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी घरचा आहेर दिला आहे.
कोकाटे यांनी नुकतीच दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, "आपले महायुतीचे सरकार आहे आणि तिन्ही पक्षांची ही सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांची भेट घेणे चुकीचे नाही. मात्र, या भेटीगाठींनंतरही अंतिम कारवाईचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे." त्यांच्या या विधानातून कृषिमंत्र्यांच्या वर्तनाबद्दलची तीव्र नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य विभागात ३०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा केलेल्या आरोपाबद्दल विचारले. त्यावर उत्तर देताना आत्राम यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, "रोहित पवार यांनी त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारेच हे आरोप केले असावेत. विरोधक म्हणून ते त्यांचे काम करत आहेत. जर त्यांनी हे आरोप पुराव्यासह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, तर त्यावर निश्चितपणे कारवाई होईल." महायुती सरकारमधील एका ज्येष्ठ नेत्यानेच आपल्या मंत्र्याच्या वर्तनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने आणि त्याचवेळी विरोधी पक्षाच्या आमदाराने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केल्याने, या प्रकरणांना आता वेगळे राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.