नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती, महाविकास आघाडीत प्रत्येक पक्ष विदर्भात पूर्व तयारीला लागला असताना पूर्व विदर्भातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशा अफलातून चुरशीच्या आणि महत्त्वाच्या म्हणजे कौटुंबिक लढती पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे विदर्भातील 15-20 जागा किमान आम्ही लढणार यावर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमचे पक्षात एकमत आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या विरोधात आमच्याकडे त्यांच्याच कुटुंबातील तगडा उमेदवार आहे. आम्ही या सक्षम उमेदवाराला मैदानात उतरविणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला असतानाच आता स्वतः धर्मरावबाबा यांनी आपले घर सांभाळावे त्यांची मुलगी शरद पवार गटाच्या संपर्कात असून ती आमच्याकडून विधानसभा निवडणूक लढू शकते, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी केला आहे.
एकंदरीत असे झाल्यास काटोलमध्ये पुन्हा देशमुख विरुद्ध देशमुख तर गडचिरोलीत आत्राम विरुद्ध आत्राम अशा रंगतदार लढती पाहायला मिळू शकतात. मात्र, अर्थातच या लढती खरंच होणार की हे कुटुंबातील इच्छुक पर्यायी मतदारसंघाचा विचार करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. यापूर्वी अनिल देशमुख विरुद्ध त्यांचे पुतणे डॉ. आशीष देशमुख असा सामना झाला. आशीष निवडून आले पुढे ते काँग्रेसमध्ये नंतर भाजपात गेले. आता पुन्हा ते इच्छुक आहेत. अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख हे काटोल मतदारसंघातून गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत.
मध्यंतरीच्या काळात अनिल देशमुख कारागृहात असताना सलील देशमुख यांनी हा मतदारसंघ येथील कार्यकर्ते पदाधिकारी सातत्याने संपर्कात राहून सांभाळले आहेत, तेच भविष्यातील उमेदवार असतील, अशीही चर्चा अनेकदा रंगली इतकेच नव्हे, तर एखादवेळी ते महायुतीचे देखील उमेदवार होऊ शकतात. अशाही चर्चा झाल्या. मात्र, अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर व लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 'अच्छे दिन' आल्यावर ते महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
पवार गटाचे खंदे समर्थक अनिल देशमुख हे अजित दादा पवार, प्रफुल्ल पटेल अशी बडीमंडळी शरद पवारांना सोडून गेल्यानंतरही शरद पवारांसोबतच निष्ठावान राहिले. विदर्भात चमत्कार घडणार असे फलक त्यांनी घरासमोर लावले. लोकसभा निवडणुकीनंतर त्याची राजकीय वर्तुळात अनेकांना प्रचिती आली. वर्धा लोकसभा मतदारसंघ त्यांनी आपले भाचे माजी आमदार अमर काळे यांच्या रूपाने भाजपच्या ताब्यातून खेचून आणला. या पार्श्वभूमीवर आता स्वतः अनिल देशमुख काटोलमधून लढतात की सलील देशमुख यांना लढवतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सलील देशमुख यांच्यासाठी शेजारच्या वरुड मोर्शी, आर्वी विधानसभा मतदारसंघाची देखील चाचपणी सुरू आहे. स्वतः अनिल देशमुख यांनी आम्ही दोघेही निवडणूक लढविणार आहोत. मी काटोलमधूनच लढणार असून सलील देशमुख यांचा मतदारसंघ कुठला ते लवकरच स्पष्ट होईल, असे 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, आत्राम यांच्या आरोपाबाबत बोलताना त्यांनी आत्राम यांच्या मुलीनेच शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली, लढण्याची तयारी दर्शविली असा पलटवार केला.
आर्वी मतदार संघात अमर काळे आता खासदार झाल्याने ही जागा आम्ही राष्ट्रवादीसाठी मागणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर सलील देशमुख आर्वी ऐवजी नागपूर शहरातील ज्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट मागत आहे. त्यावर दावा करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन मतदारसंघावर शरद पवार गटाची दावेदारी असून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे पूर्वमधून तर पश्चिम मधून सलील देशमुख इच्छुक आहेत.
दुसरीकडे अजित दादा पवार गटातून पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ मागितला जात आहे.पश्चिममध्ये शहराध्यक्ष प्रशांत पवार तर उत्तर मध्ये अनेक दावेदार आहेत. मात्र भाजप हे दोन्ही मतदारसंघ त्यांना महायुतीत सोडणार का? तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला काँग्रेस पूर्व आणि पश्चिम सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.