Nana Patole on Manoj Jarange protest
नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे आणि त्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
एकीकडे मराठा आंदोलकांनी 29 रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी महासंघाने 28 ऑगस्ट रोजी या संदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केल्यावरून भाजप नेत्यांनी जरांगे यांचा तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा ओबीसी वादाकडे, तापलेल्या वातावरणाकडे गणेशोत्सवात सर्वांचे लक्ष लागले आहे .
नाना पटोले म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळात राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रश्नावर ओबीसी जनगणना हाच एकमेव उपाय आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट करीत पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करीत भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.