

नागपूर: One Nation, One Election| महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची पुन्हा एकदा तयारी दर्शविली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला आज येत आहेत. बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील पराभवाचे विश्लेषण करतील.
यावेळी पटोले यांनी केंद्र सरकारच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्तावावरही टीका केली. त्यांनी हा प्रस्ताव देशातील लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शासन प्रणाली केंद्रीकृत करण्यासाठी आणि संघराज्य प्रणालीला कमकुवत करण्यासाठी हा प्रस्ताव आहे. संसाधन वाचविण्याच्या नावाखाली सरकार नागरिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,असेही पटोले म्हणाले.
दरम्यान,पटोले यांनी इशारा दिला की या उपक्रमामुळे लोकशाही सहभाग आणि जबाबदारी यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. "वन नेशन, वन इलेक्शन ही केवळ एकत्रित निवडणुकांपुरती मर्यादित कल्पना नाही; ती विविध आवाज दाबण्याची आणि राज्यांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग कमी करण्याची पद्धत आहे. सरकारकडून जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी राजकीय अजेंडा पुढे रेटण्यावर भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सरकारच्या योजनांमुळे देशाच्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, राजकीय पराभवानंतर काँग्रेसमधील नाराजी वाढत असताना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.