

नागपूर - पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याच्या थाटात शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत घेतलेली आढावा बैठक राजकीय दृष्ट्या चर्चेत आली आहे. रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी हे शासकीय सभागृह की राजकीय व्यासपीठ असा सवाल उपस्थित केला आहे. बावनकुळे यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला तर केदार गटाचे खासदार बर्वे यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला.
१७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जि.प.च्या विविध विभागाचा आढावा घेतला. बैठकीला जि.प.तील एकाही पदाधिका-यांना बोलाविण्यात आले नाही. उलट या बैठकीमध्ये भाजप पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष मंत्र्यांसोबत मंचावर बसले होते. त्यामुळे ही आढावा बैठक की भाजपची बैठक होती? असा सवाल उपस्थित करत खासदार श्यामकुमार बर्वेंनी उद्या खासदार म्हणून मी काँग्रेसच्या नेत्यांना आढावा बैठकीत मंचावर बसविले तर चालेल का? असा टोलाही लगावला आहे.
मिनी मंत्रालय अर्थात जि.प. पदाधिकारी व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ शुक्रवारी संपुष्टात आला. कै. आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे हे पालकमंत्री नाहीत. त्यानंतरही मंत्री या नात्याने त्यांनी आढावा बैठक घेतली याला आमची हरकत नाही. मात्र, जि.प.च्या सभागृहातच ही बैठक घेणे आवश्यक होते का? घ्यायचीच होती तर आजच का घेतली? घेतलीच तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत जि.प.तील पदाधिका-यांचा कालावधी असताना त्यांना बैठकीला का बोलाविण्यात आले नाही? इतकेच नाही तर बैठकीच्या मंचावर भाजपच्या अन्य पदाधिका-यांना बसविले. यातील कुणीही लोकप्रतिनीधी नव्हते. तुमची सत्ता आली तर तुम्ही मनात येईल तसे वागाल हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला. याच मुद्द्यावरुन खा. बर्वेंनी जि.प.चे सीईओ विनायक महामुनी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत, त्यांच्याकडे नाराजीही व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.