

नागपूर: उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता 21 डिसेंबरला राज्यभरातील न.प. निवडणूक निकाल लागणार आहेत. राज्यातील काही नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रियाही पुढे गेल्याने यंदाच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर आचारसंहितेचे सावट आहे. जि.प, मनपा निवडणुकीपूर्वी होणारे अधिवेशन म्हटल्यावर धडाकेबाज घोषणांची शक्यता असते. मात्र आदर्श आचारसंहितेमुळे यावेळी महायुती सरकारला जनहिताच्या घोषणा किंवा मोठे निर्णय घेण्यावर निर्बंध असणार आहेत.
महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना, मोर्चेकरी, धरणे मंडप, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची सोडवणूक करताना देखील सरकार मध्यममार्ग शोधण्याची शक्यता आहे. यामुळेच या अधिवेशनात कोणतेही मोठे घोषणात्मक निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीची अधिसूचना १५ ते २० डिसेंबर दरम्यान जारी होण्याचे संकेत आहेत. तूर्तास 14 डिसेंबरपर्यंत अधिवेशन म्हटले तरी शनिवार किंवा रविवारचे कामकाज होण्याची शक्यता कमी आहे.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक महत्वाचे आहे. विभागनिहाय अहवाल, शिल्लक प्रशासकीय कामे मार्गी लागताच हे अधिवेशन वेळेआधीच गुंडाळले जाऊ शकते. नागपूर करारानुसार नागपुरात अधिवेशन निश्चित असले तरी सातत्याने कालावधी मात्र कमी होत असल्याची खंत विदर्भातील जनतेला आहे.