

नागपूर : शहरातील सीताबर्डी लोखंडी पुलाजवळ शनी मंदिराकडे जाणाऱ्या चौकात तयार झालेला वारकरी संप्रदायाचा देखावा गेले अनेक महिने प्रशासनाच्या अनास्थेमुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. एकतर ही जागा या आदरयुक्त विषयासाठी चुकली. आता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यावर धूळ साचली आहे. प्लास्टिक फाटले .त्यावर कागदाच्या पातळ पट्ट्या बांधल्या आहेत. या वारकऱ्यांच्या मूर्ती पाहून तिथून जाणारे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अशा प्रकारे दुर्लक्षित ठेवणे हे केवळ प्रशासनाची उदासीनता दर्शवत नाही तर समुदायाच्या श्रद्धेचा अनादर देखील दर्शवते.
खरेतर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी हे चित्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये दिंडीच्या स्वरूपात वारकरी अशा मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. या परिस्थितीवर स्थानिक नागरिक आणि भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन धार्मिक स्थळे आणि चित्रफितींची देखभाल करण्याची जबाबदारी का टाळत आहे? असा सवाल यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. वारकरी संप्रदायाच्या भाविकांच्या आणि अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करून त्याचे उद्घाटन करावे अशी मागणी केली.