Lok Sabha Election 2024 : भर उन्हात विदर्भात प्रचार शिगेला: प्रहारचे बुब यांना शिट्टी, तुपकरांच्या हाती पाना

Lok Sabha Election 2024 : भर उन्हात विदर्भात प्रचार शिगेला: प्रहारचे बुब यांना शिट्टी, तुपकरांच्या हाती पाना
Published on
Updated on


नागपूर:
  विदर्भात एकीकडे कडक उन्हाळा तर दुसरीकडे वादळी पावसाचा तडाखा अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपूरला पार पडली. यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी 1984 च्या दंगलीवरून काँग्रेसवर केलेली टीका आता राज्यभरात काँग्रेसचा त्यांच्याविषयी रोष ओढवताना दिसत आहे. दुसरीकडे उद्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात मोदी येत आहेत. Lok Sabha Election 2024

पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जागांवर 19 एप्रिलरोजी मतदान होत आहे. सर्वच ठिकाणी भाजप- काँग्रेस किंवा शिवसेना अशा थेट लढती बघायला मिळत असताना पश्चिम विदर्भात मात्र बंडखोर,अपक्षांनी निवडणूक चुरशीची केली आहे. कमी दिवसांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह मतदारांपर्यत पोहचविण्याचे आव्हान वर्धेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यापुढे आहे. खासदार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांची अपक्ष उमेदवारी काळे यांना डोकेदुखी ठरत आहे. Lok Sabha Election 2024

दुसरीकडे अमरावती मतदारसंघात महायुतीशी थेट पंगा घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी उमेदवारी दाखल करत काँग्रेस आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यातील लढत तिहेरी केली आहे. प्रहारला नेहमी कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळत असले तरी यावेळी मात्र त्यांना शिट्टी निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आता येत्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे.

दुसरीकडे, बुलढाणा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यापुढे शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर यांच्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उभे ठाकले आहेत. तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.  त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट कसणार, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून कानी पडत आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन तुपकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

जिल्ह्यातील खिळखिळा झालेल्या विकास रथाच्या चाकाचे नट आता रविकांत तुपकर पाना फिरवून फिट करणार असल्याचा दावा समर्थक करीत आहेत. अमरावतीत निवडून आणा, असा असा नारा राणा दांपत्याकडून जोरात असताना बुलढाणा जिल्ह्यात दाखवा आता जनतेचा बाणा निवडून आणू पाना, पाना…रविकांत तुपकर निवडून आणा, असे नारे ऐकावयास मिळत आहेत. एकंदर विदर्भात प्रचार वेग धरताना दिसत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news