

Heavy Rain Storm in Vidarbha
नागपूर: नागपूरसह विदर्भात पुढील तीन तासांत वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात सरासरी ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस येईल, असा अंदाज आहे.
याशिवाय अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात गेले काही दिवस सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली असताना नागपुरात मात्र कडक ऊन होते. पहिल्यांदा बुधवारी रात्री दहापासून उशिरापर्यंत उपराजधानीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागपूरकर पहिल्या पावसात चिंब झाले. आज सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला. घरोघरी कुलर, एसीला या दमदार पावसाने काहीशी विश्रांती मिळाली. नागपूर जिल्हा तसेच विदर्भात या पावसाने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग वाढली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या मुंबई नागपूर विमानाने आलेल्या प्रवाशांना नागपुरातील पहिल्या जोरदार पावसाचा, इंडिगो व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसला. विमानातून उतरताना एरोब्रीजने थेट नेण्याऐवजी प्रवाशांना पावसात भिजत बसपर्यंत जावे लागले. या बसमध्ये देखील पाणी गळत होते. छत्र्या होत्या पण पावसाशी मुकाबला करणारी व्यवस्था नव्हती, अशा तक्रारी ऐकायला मिळाल्या.
यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही विमानतळाची तसेच इंडिगो व्यवस्थापनाच्या प्रवाशांशी सौजन्याची पोलखोल देखील झाली. कुणीही यासंदर्भात बोलण्यास तयार नव्हते. विशेष म्हणजे या विमानाने राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि आमदार आशिष देशमुख नागपुरात आले होते.