

नागपूर : वसूलीबाज आणि संपत्ती बळकावणाऱ्याला कुणापासून धोका आहे? गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची यादी पाहिली तर अनेकांना धक्का बसेल. कदाचित जवळच्याच नेत्यांपासून भीती असावी असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.आकाच्या आकाला वाचविण्यासाठीचा खटाटोप त्यांच्या जीवाला धोका वाटत असेल. याबाबत स्वतः कराड किंवा पोलिसच सांगू शकतील असा गौप्यस्फोट पुन्हा एकदा काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंबच झाला. आरोपी फरार आहेत. पोलिसांची भूमिका लक्षात घेता पोलिसांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांचे नाव आणि दरारा कमी होताना दिसत आहे हे दुर्दैवच म्हणता येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी दिरंगाई केली आणि बीड येथील काही अधिकाऱ्यांनी त्यावर पांघरून घालण्याचे काम केले. 22 दिवस वाल्मिक कराड गायब होता. पण पोलिसांना पत्ताच नव्हता. मंत्रिमंडळ शपथ विधीच्या वेळी वाल्मीक कराड नागपुरला होता काय, आ जितेंद्र आव्हाड आणि धस यांनी तसे सांगितले. आज दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करीत आहेत. सरकारमध्ये समन्वय नाही. मुख्यमंत्र्यांचा धाक नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी असून अधिक चौकशी गरजेची आहे. एसआयटी, सीआयडीने कुणाच्याही प्रेशरखाली न येता शोध घ्यावा. सर्व आरोपींची उठबस मंत्र्यांकडे होती. घरात येत होते असे लोक बोलतात. ते आता म्हणतात माझा संबंध नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली.
बीडला नेमले जाणारे पोलिस नेत्यांच्या मर्जीने नेमले जातात. अनेक अधिकारी बीड जिल्ह्याचे आमच्याकडे येतात. ते सांगतात एवढे काम करण्याची गरजच नाही. बीडप्रमाणे 25 टक्के करू. निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि नेते वाटून घेतात. कॅग अहवालात ते आले. 96 हजार कोटीपैकी अर्ध्याअधिक कामे बीड जिल्ह्यातील. 15 किंवा 20 टक्के दिल्याशिवाय 5 लाख रुपयांचे काम देखील होत नाही. बिहारला लाजवेल असे काम बीडमध्ये सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.