

नागपूर: नागपुरात सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे जागतिक दर्जाचे 'कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्पेनमधील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनी सोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा करार स्वाक्षरीत झाला.
या वेळी स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पायोनियर एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अरोरा आणि उपाध्यक्ष जीत अरोरा, तसेच जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नागपुरात प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटर हे केवळ प्रदर्शने आणि कार्यक्रमांसाठी वापरले जाणारे केंद्र न राहता, ते सांस्कृतिक उपक्रमांसाठीही एक हक्काचे व्यासपीठ ठरावे. नागपूरचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा या सेंटरच्या रचनेत प्रतिबिंबित व्हावा. हे केंद्र आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक वास्तूचे आदर्श उदाहरण ठरावे.”
स्पेनचे राजदूत जुआन अँटेनियो म्हणाले, “भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. मुंबई हे केवळ भारताचेच नव्हे तर दक्षिण आशियाचे ‘पॉवर हाऊस’ बनत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबत काम करणे स्पेनसाठी अभिमानाची बाब ठरेल,” असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अधिवेशन केंद्र लाभणार असून, पर्यटन, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.