

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत एक चार वर्षीय विद्यार्थी रात्रभर राहिलाच कसा?, या मुलाला वर्गात बेवारस सोडले कसे?, यासंबंधीचा अहवाल शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मागितला आहे.
कुणाचेही लक्ष नसल्याने झोपी गेलेल्या विद्यार्थाला रात्रभर वर्गातच बंद राहावे लागल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणाची दखल राज्य शिक्षण विभागाने घेत नागपूर विभागीय उपशिक्षण संचालकांना सविस्तर चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुलांच्या सुरक्षेबाबत तडजोड सहन केली जाणार नसल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे पालक व स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शाळांमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आता पुढील निर्णय अहवालानंतर घेतला जाईल.
शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना
खेळत असताना बालक चुकून एका वर्गात गेला. दिवसअखेर शाळा बंद करताना कर्मचाऱ्यांकडून अंतिम पाहणी करण्यात आली नाही. परिणामी, वर्गाला कुलूप लागल्याने बालक संपूर्ण रात्र आतच अडकून राहिला. मात्र,दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा उघडल्यानंतर तो सुरक्षित अवस्थेत आढळून आला. दरम्यान, शाळा बंद करताना वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व परिसराची प्रत्यक्ष तपासणी करूनच कुलूप लावणे बंधनकारक करणाऱ्या नव्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत.