

नागपूरः शुक्रवारी रात्री वादळी पावसाने उपराजधानीत, जिल्ह्यात काही भागात तारांबळ उडविली. दुसरीकडे सदर आझाद चौक परिसरातील एका दुमजली घराला लागलेल्या आगीनंतर घरातील 16 सदस्यांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार रात्री पाऊस व वाऱ्यामुळे विद्युत खांबावरील तारांमध्ये स्पार्क झाले आणि त्याची ठिणगी घरावर असलेल्या प्लास्टिकवर पडल्याने ही आग लागली. दरम्यान वरच्या माळ्यावर घरमालक मनोज गटलेवार यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. ही आग लागली त्यावेळी घरातील महिला सदस्य स्वयंपाक करीत होत्या. घराच्या छताला आगीचे, धुराचे लोळ दिसताच सर्वांची पळापळ सुरू झाली. याच दरम्यान घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराचे मोठे नुकसान झाले. तीन अग्निशमन बंबांनी ही आग रात्री उशिरापर्यंत नियंत्रित केली.