

नागपूर; वृत्तसंस्था : राज्य विधिमंडळाच्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खोल्यांचे दर गगनाला भिडल्याने नागपूरमधील प्रीमियम (उच्च श्रेणी) हॉटेलात एका रात्रीचा मुक्काम तब्बल ८५ हजार रुपयांपर्यंत महागला आहे. सध्या लग्नसराईमुळे खोल्यांच्या उपलब्धतेवर ताण वाढला असून त्यामुळे दरांत प्रचंड वाढ झाली आहे.
वाढत्या मागणीचा गैरफायदा घेण्यापासून चालकांना रोखण्यासाठी राज्य सरकारने खासगी बसच्या तिकीट दरांवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस दराच्या १.५ पट पर्यंतची मर्यादा घातली आहे; मात्र हॉटेलच्या दरांवर नियंत्रणासाठी अशी यंत्रणा अस्तित्वात नाही, हे विशेष.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हिवाळी अधिवेशन काळात प्रीमियम हॉटेल्स प्रतिरात्र ५० हजार ते ८५ हजार रुपये दर आकारत आहेत. सामान्यतः पाच हजार रुपये दर आकारणाऱ्या मध्यम श्रेणीतील हॉटेल्सनीही दर पाच ते सहा पटींनी वाढवून २५ हजार ते ३० हजार रुपये केले आहेत. गेल्यावर्षीच्या अधिवेशनात डिलक्स रूमसाठी सुमारे ७० हजार रुपये दर आकारणाऱ्या प्रीमियम हॉटेलने आता ८५ हजार रुपये दर सांगितला आहे. ही वाढ २१ टक्क्यांहून अधिक आहे. नागपुरात सुमारे १० तारांकित व २०० मध्यम श्रेणीतील हॉटेल्स आणि इतर २०० निवास अपार्टमेंटस् आहेत. या सर्वांमध्ये मिळून सुमारे ८ हजार ते १० हजार खोल्यांची क्षमता असल्याचे सूत्राने सांगितले. दरम्यान, हॉटेलच्या अवाजवी दरांचा हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही.
प्रवासही महागला
प्रवासाचा खर्चही वाढला असून अधिवेशनाच्या काळात मुंबईहून नागपूरला येणाऱ्या एकेरी विमान प्रवासाचे दर १५ हजार ते २०,००० रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्त दरवर्षी मंत्री, आमदार, नोकरशहा, राजकीय कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात. आपल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून नागपूरला येणाऱ्या सर्वसामान्यांना या वाढीव दरांचा सर्वाधिक फटका बसतो.
सुरुवात : ७ डिसेंबर
प्रीमियम हॉटेलचे दर : प्रतिरात्र
५० हजार ते ८५ हजार रुपये
मध्यम श्रेणी हॉटेल : ५ हजारांऐवजी २५ ते ३० हजार रुपये
नागपूरमधील एकूण
खोल्या : ८ ते १० हजार
खासगी बसभाडे मर्यादा :
एसटी दराच्या १.५ पट;
हॉटेल दरांवर मर्यादा नाही
मुंबई-नागपूर एकेरी विमान
भाडे : १५ ते २० हजार रुपये