

Nagpur SBL Energy blast death toll
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड स्फोटक निर्मिती कंपनीत झालेल्या स्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची डीएनए तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. तर दुसरीकडे आपल्या आप्तेष्टांच्या आठवणीने, ओळख पटविताना छिन्नविछिन्न मृतदेह झाल्याने नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश दुसऱ्या दिवशीही कायम आहे.
आतापर्यंत 19 कामगारांचा मृत्यू झाला. 18 गंभीर जखमींवर नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पीटल आणि इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यावर नातेवाईक, आसपासचे गावकरी कंपनी परिसरात पोहोचले. मात्र, कंपनीने सर्वांना बाहेरच रोखून धरल्याने सहा सात तास कुणालाच काय झाले, कोण गेले कोण जखमी आहेत हे कळत नव्हते. दुपारी १ वाजतादरम्यान प्रशासनाने श्रमिकच्या कुटुंबीयांना डीएनए चाचणीसाठी बोलाविण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या काळजाचे पाणी झाले. होळी, धुळवडीच्या दिवसात आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यसंस्काराची पाळी या ग्रामस्थांवर आली असून या वेदनेनेच आसपासची गावे आज सुन्न झालेली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांमध्ये वर्षा टेकाम, पायल गजभिये, मीना उईके, प्रतिभा वाळके, दुर्गा गायकवाड, शोभा तापसे, अनसुया पाटील, सुनीता सलामे, ज्योत्स्ना शेंद्रे, मंगेश्री येसकर, गायत्री शेंडे, संगीता पंचभाई, सुनंदा चिंचखेडे, सविता काळमेघ, गोपी कोवे, गणेश टोंगे, राजेंद्र कुळमेथे, प्रेमदास बागडे यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये काजल कौरती, आम्रपाली कालसर्पे, दुर्गा गाडगे, ज्योती धुर्वे, सुजाता रक्षित, उषा रेवतकर, रितू सलाम, सुनीता उईके, दुर्गा शेवतकर, रंजना घागरे, मनीषा धुर्वे, वैशाली धुर्वे, सीमा धुर्वे, वैशाली सतई, रोशनी मसराम, वर्षा टेकाम, मयूरी धुर्वे, सीमा वाघाडे, गायत्री इरपाची, कविता उईके, अर्चना पेठे, भारती शेंडे, सुचिता बागडे यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, कळमेश्वर, बाजारगाव परिसरात अनेक स्फोटके निर्मिती कंपन्यांमधील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या स्फोटाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढील कारवाई, नुकसान भरपाई संदर्भात सोमवारी (दि.२) विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. प्रशासन, पोलिस, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पेसो), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपयांची तर जखमीना ५० हजार रुपये आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, सायंकाळपर्यंत मेडिकल रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी देहांचे अवशेष असलेली २२ पाकिटे प्राप्त झालीत. रुग्णालयात पोहोचलेल्या २२ पाकिटांमध्ये काही मृतदेह शाबूत होते तर काही केवळ शरीराचे छिन्नविच्छिन्न झालेले भाग होते. एकूण १६ जांचे शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यामध्ये १२ महिला, ३ पुरुष आणि एका केवळ शरीराच्या भागाचा समावेश होता. अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे असल्याने, त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीचा आधार घेतला जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील एमएमपी अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीत एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार कंपनीत डिसेंबर २०२४ला स्फोट झाला. यावेळी ९ लोकांचा मृत्यू झाला.
भिलगाव येथील फार्मा कंपनीच्या युनिटममध्ये स्फोटात एकाचा मृत्यू, तर 6 जण जखमी झाले.
सुराबर्डीतील चामुंडी कंपनीत जून २०२४ मध्ये स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला.
एशियन फायरवर्क या कंपनीत १६ फेब्रुवारी २०२५ मध्ये स्फोट झाला दोन कामगारांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर २०२५ला सोलार एक्स्प्लोझिव्हमध्ये स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू तर २६ जण जखमी झाले.