

नागपूर : सावनेर तालुक्यातील दोहडघाट परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने २१ व २२ या दोन दिवसीय विशेष मोहीमेत प्रतिबंधित 'थाई मांगूर' मास्यांच्या अवैध मत्स्यपालनावर धडक कारवाई केली. या कारवाईत शेततळ्यांमधून सुमारे ७४ टन जिवंत मांगूर मासे जप्त करून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या बेकायदेशीर मत्स्यपालनाप्रकरणी संशयित बाडू शेख याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत गेल्या ३ महिन्यांपासून जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५० टनांहून अधिक मांगूर माशांचा साठा नष्ट करून नागपूर परिसरातील अवैध नेटवर्क मोडून काढण्यात आले आहे.
ही कारवाई प्रादेशिक उपआयुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांच्या नेतृत्वात पार पडली. मोहिमेत मत्स्यव्यावसाय विकास अधिकारी प्रशांत वैद्य, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी निखिल नारद, अंकित वैद्य, जितेश केशवे, शिवानंद पाटील, सतीश क्षीरसागर, अविनाश सदावर्ती यांनी सक्रिय भूमिका बजावली.