

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यापैकी काही निर्दोष व्यक्तींनाही अटक करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान (Pyare Khan) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला निर्दोष व्यक्तींची त्वरित सुटका करण्याचे निर्देश दिले. खान यांनी यासंदर्भात नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्याशी चर्चा करून निर्दोषांची ओळख पटवून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यास सांगितले.
नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, ज्यामध्ये कुटुंबीयांनी पुराव्यांसह दावा केला की ताब्यात घेतलेले त्यांचे नातेवाईक हिंसाचारात सहभागी नव्हते. कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे श्री खान यांच्या समोर सादर केले. खान यांनी या तक्रारींची तात्काळ दखल घेत संबंधित लोकांना न्याय मिळेल असे आश्वासन दिले. यासंदर्भात त्यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
खान यांनी सांगितले की, "हिंसाचाराच्या वेळी अनेक लोक फक्त योगायोगाने त्या ठिकाणी उपस्थित होते. काही नमाज अदा करून घरी परतत होते, काही जण रेल्वे स्टेशनला जात होते, तर काहीजण त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त रस्त्याने जात होते, त्याचवेळी हिंसाचार भडकला." पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनेकांना ताब्यात घेतले असले तरी, काही प्रकरणांमध्ये चुकीची माहिती किंवा संशयाच्या आधारावर निर्दोष लोकही ताब्यात घेतले गेले आहेत. त्यामुळे प्यारे खान यांनी पोलिस प्रशासनाला उपलब्ध पुराव्यांची सखोल चौकशी करून हिंसाचारात सहभागी नसलेल्या लोकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश दिले.
प्यारे खान यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराची तीव्र शब्दात निषेध केला. "दंगेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, परंतु ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, अशा निर्दोष लोकांना शिक्षा होता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, "आयोगाला अनेक कुटुंबीयांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये सबळ पुराव्यांसह निर्दोषत्वाचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांना या पुराव्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्यारे खान यांनी दिले आहेत.