

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याने नागपूरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शपथग्रहण सोहळ्यानंतर प्रथमच रविवारी (दि.१५) ते नागपुरात येत आहेत. यापूर्वी दोनदा त्यांचा नागपूर आगमनाचा मुहूर्त लांबणीवर पडला. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असताना फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर सजले असून ठिकठिकाणी झेंडे, भगव्या पताका लावून कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या जात असून धरमपेठ त्रिकोणी पार्क या फडणवीस यांचे निवासस्थान परिसरात जणू या निमित्ताने देव दिवाळी साजरी होणार आहे. घराघरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठमोठे कटआउट लावले आहेत. विधान भवन परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देखील कटआउट लागले आहे. महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून शिवसेनेच्या वतीने लावलेले विधान भवन परिसरातील एकनाथ शिंदे यांचे होर्डिंग लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे रविवारीच नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवन येथे होत आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच येत असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी महानगर भाजपने केली आहे. माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर विमानतळ चौकातील प.पू. हेडगेवार स्मारकस्थळी वंदन करतील.वर्धा मार्गावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागताची भव्य महारॅली काढण्यात येणार आहे. प.पू. हेडगेवार स्मारक स्थळापासून रॅलीला सुरुवात होईल. सोमलवाडा चौक, राजीव नगर चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौक, छत्रपती चौक येथून डावीकडे खामला चौक येथून उजवीकडे तात्या टोपे चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक मार्गाने लक्ष्मीभुवन चौक येथे रॅली येईल. लक्ष्मीभुवन चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधित करणार आहेत. यानंतर कारने निघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रॅलीची सांगता होईल.