

राजेंद्र उट्टलवार
नागपूर : कधीकाळी भाजपचा सहज सोपा राहिलेला नागपूर शिक्षक, पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतल्यानंतर आता सोपा राहिलेला नाही. यावेळी तर मोठी बंडखोरी दिसत आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रमुख केलेले माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाने विश्वास टाकत आज उमेदवारी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाराज कट्टर समर्थक माजी शिक्षक आमदार प्रा अनिल सोले उद्या नामांकन दाखल करणार आहेत.
दुसरीकडे दुसरीकडे अनेक वर्षे काम करणारे लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड. रमण सेनाड हे देखील उद्याच सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करणार आहें. आता भाजपसाठी सोपी वाटणारी परीक्षा यंदा पुन्हा कठीण झाली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना कायम कामाला लावले आहे. शेवटच्या क्षणी नवा उमेदवार जाहीर करण्याचा फंडा यावेळी पदवीधर निवडणुकीतही भाजपकडून वापरला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भारी ठरले.
पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. नितीन गडकरी या परंपरागत मतदारसंघातून लढत असताना ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीपासून नियोजन करीत होते. यंदा कोहळे यांनीही आपले होमवर्क झाल्याचा दावा केला आहे. बघूया आता काँग्रेस हा मतदारसंघ टिकवते की भाजप पुन्हा परत घेते.
असा आहे निवडूक कार्यक्रम
६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबरला अजांची छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अमरावतीमध्येही महायुतीत विद्यमान भाजप आमदार, शिवसेनेसाठी ही जागा सुटल्याने ते आणि प्रहार असे तीन प्रबळ तर इतर अपक्ष दावेदार आहेत. सर्वांची शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही.