

Nagpur Pet Dog Regulations
नागपूर: पाळीव कुत्र्यांना घराबाहेर फिरवताना त्यांच्या तोंडावर जाळी लावणे नागपूर पोलिसांनी बंधनकारक केले आहे. यासोबतच पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता लिहिणेही अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर शहरातील नागरिकांनी पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासंदर्भात नागपूर पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आदेश देताना सांगितले की, पाळीव कुत्र्याचा उपद्रव झाल्यास नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. जाळीशिवाय एखादा पाळीव कुत्रा आढळल्यास त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई करण्यात येईल. काही कुत्र्यांचे मालक घराच्या दरवाज्याबाहेरच कुत्र्यांना सोडून देतात आणि यातून अनेकाना नाहक त्रास होतो. गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी जोरात आहे.