Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पात टीयूआय-२१ वाघिणीची यशस्वी सुटका; वैद्यकीय तपासणीनंतर कोअर क्षेत्रात सोडले

Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पात टीयूआय-२१ वाघिणीची यशस्वी सुटका; वैद्यकीय तपासणीनंतर कोअर क्षेत्रात सोडले
Published on
Updated on

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत टीयूआय-२१ या मादी वाघिणीला यशस्वीरित्या पकडून वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षितपणे जंगलातील कोअर क्षेत्रात सोडण्यात आले. वाघीण वारंवार मानवी वस्तीच्या परिसरात येत असल्याने आणि तिच्याकडून जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील पौनी यूसी परिक्षेत्रातील उसरीपार बीटमध्ये मंगळवारी सकाळी टीयूआय-२१ या वाघिणीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पकडण्यात आले. मानवी वस्तीजवळ वारंवार वावर आणि गुरांवरील हल्ल्यांमुळे भविष्यात मानव-वाघ संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.

वाघिणीला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय पथकाने तिची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत ती पूर्णपणे निरोगी असून जंगलात पुन्हा सोडण्यासाठी सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत टीयूआय-२१ ला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी परिक्षेत्राच्या कोअर क्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले. मानवी वस्तीपासून दूर असलेल्या या अधिवासात वाघिणीचे पुनर्वसन करण्यात आले.

ही संपूर्ण मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एस. रमेश कुमार आणि उपसंचालक अक्षय गजबिये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पूर्व पेंचच्या सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर, पौनी यूसीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित माने, पूर्व पेंचचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी बावसकर तसेच पराग भुते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news