

नागपूर - बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या प्राणिगणनेत यंदा जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड-पवनी-करंडला वन्यजीव अभयारण्यात ११ वाघ आणि १६ बिबटे आढळले आहेत. मचाण गणनेमध्ये सहभागी झालेल्या वन्यप्रेमींनी केलेल्या गणनेतून ही आकडेवारी पुढे आली आहे. वन विभागाच्यावतीने दरवर्षी निसर्गानुभव कार्यक्रम राबविला जातो. वन्यप्रेमिना सहभागी करून घेतले जाते.यावेळी एकूण २,७६३ प्राण्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये, मांसाहारी आणि तृणभक्षी अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या नोंदींचा समावेश आहे.
एकूण ७६ मचाण बांधण्यात आले होते आणि १२० वन्यप्रेमी यावेळी सहभागी झाले होते. पेंच प्रकल्पातील दोन बफर वनपरिक्षेत्र आणि उमरेड-पवनी-करंडला वन्यजीव अभयारण्यातील वनपरिक्षेत्रांमध्ये क्षेत्र संचालक रमेशकुमार यांच्या नेतृत्वात ही गणना करण्यात आली. याशिवाय, दोन्ही जंगलातील पक्षीवैभवाचीही नोंद झाली.
असे आढळले प्राणीवैविध्य
वाघ - ११ बिबटे - १६, चितळ एक हजारपेक्षा जास्त
सांबर ४५०, गवा सुमारे ५००
यासोबतच नीलगाय, रानडुक्कर, अस्वल, सायाळ, पॅंगोलिन, अजगर, घोरपड, कोल्हा, लांडगा, गरुड, घुबड असे प्राणीवैविध्य आढळून आले.