

Mumbai youth notice tiger abuse investigation
नागपूर : एका पट्टेदार वाघाच्या अंगावरून हात फिरवत त्याचे अंगावर बसण्याची, त्याला दारू पाजण्याची मध्यंतरी जोरात व्हायरल झालेली रील एका व्यक्तीला चांगलीच भारी पडणार आहे. एआय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ही रील व्हायरल केल्याचे समोर आले आहे.
नागपूर ग्रामीण सायबर पोलिसांनी यासंदर्भात राहुल रविंदर नंदा (रा. सांताक्रुज, पश्चिम मुंबई) या इंस्टाग्राम धारकास नोटीस बजावली असून ही रील देखील डिलीट केली आहे. नंदा यांचे एआय कलाकारी नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट असून 30 ऑगस्टला या अकाउंटवरून हातात दारूची बाटली घेत एक जण वाघोबाचे लाड करताना, त्याला दारू पाजताना रील व्हायरल झाली होती.
विशेष म्हणजे हे चित्रीकरण नागपूर जवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरातील असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे वनविभागातही खळबळ उडाली. पेंच व्याघ्र प्रकल्पाची यामुळे बदनामी झाल्याने वन्य प्रेमींनी संताप व्यक्त केला. शेवटी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गंभीर दखल घेत अप्पर अधीक्षक अनिल मस्के व सायबर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. सायबर पोलिसांनी रील पोस्ट करण्याचा तांत्रिकदृष्ट्या शोध सुरू केला.