

नागपूर - महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत ए.जी. एन्व्हिरो प्रा. लि. या कंपनीतील स्वच्छतादूत सिद्धू घोडके यांचा आज अपघाती मृत्यू झाल्याने वातावरण तापले. कंपनीच्या गाडी दुरुस्ती विभागातील निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.
या घटनेनंतर संतप्त कामगारांनी सिद्धू घोडके यांच्या कुटुंबीयांना तात्काळ योग्य मोबदला देण्याची,दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. भांडेवाडी कचरा डंपिंग यार्डमध्ये कचऱ्याचा संपूर्ण डाला अंगावर पडल्याने सफाई कामगाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमीला मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोषींवर ठोस कारवाईच्या मागणीसाठी संतप्त कामगार, भाजप कार्यकत्यांनी सक्करदरा पोलीस स्टेशन समोर मृतदेह घेऊन जाण्याचा पवित्रा घेतला. दोषींवर कारवाई आणि परिवाराला मोबदला देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.