

Nagpur Municipal Corporation Election
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) यांनी हातमिळवणी केली आहे. या नव्या समीकरणामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने नागपुरात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे, कामगार आणि झोपडपट्टी भागात प्रभाव असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शरद पवार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला आहे. "पुरोगामी विचारांची जपणूक करण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांनी प्रभागांनुसार आपापल्या ताकदीचा आढावा घेतला असून, जिथे भाकपची ताकद जास्त आहे तिथे राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देईल आणि उर्वरित ठिकाणी भाकप राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करेल.
वाढती महागाई, बेरोजगारी, शहराचा पाणीप्रश्न आणि कंत्राटी कामगारांच्या समस्या या मुद्द्यांवर ही युती निवडणूक लढवणार आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. नागपूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि डाव्या पक्षांची ही जवळीक सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून ती वैचारिक अधिष्ठानावर आधारित आहे. समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
— अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
आमचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार जुळणारे आहेत. आम्ही दोन्ही पक्ष भाजपच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात आहोत. समविचारी मतांचे विभाजन टाळून एकमेकांच्या ताकदीचा फायदा करून घेण्यासाठी आम्ही ही हातमिळवणी केली आहे.
– श्याम काळे, राज्य सहसचिव, भाकपा