

नागपूर : नागपूरचे संशोधक राहुल बबनराव भेंडे यांच्या अभ्यासामुळे पतंगांच्या दोन दुर्मिळ प्रजातींची भारतात प्रथमच नोंद झाली आहे. Strotihypera macroplaga आणि Sarbanissa subflava या नॉक्टुइड कुळातील पतंगांच्या नोंदीमुळे भारतीय पतंग वैविध्यात दोन नवीन प्रजातींची भर पडली असून, मध्य भारतातील पतंगांच्या भौगोलिक वितरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या संशोधनाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय ‘Bionotes’ नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र पदव्युत्तर अध्यापन विभागाशी संबंधित सर्वेक्षणादरम्यान या दोन्ही प्रजातींची नोंद करण्यात आली. २८ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठ परिसरात २५० वॅटच्या मर्क्युरी-व्हेपर लाइट ट्रॅपच्या सहाय्याने Strotihypera macroplaga चे पाच नमुने मिळाले. प्रौढ पतंगांची बाह्य शारीरिक वैशिष्ट्ये तसेच नर-मादीच्या जननेंद्रियांची तपासणी करून त्यांची प्रजाती निश्चित करण्यात आली.
Strotihypera macroplaga ची भारतातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. विशेष म्हणजे, या नोंदीमुळे ‘Strotihypera’ या वंशाचे ज्ञात भौगोलिक वितरण प्रथमच दख्खनच्या पठारापर्यंत विस्तारल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी भारतात या वंशाचे प्रतिनिधित्व Strotihypera semiochrea या प्रजातीद्वारे होत असल्याचे ज्ञात होते. ही प्रजाती प्रामुख्याने ईशान्य भारतातील, विशेषतः मेघालयातील खासी टेकड्यांमध्ये आढळते. नागपुरात S. macroplaga आढळल्यामुळे या वंशाचे ज्ञात वितरण ईशान्य भारतापासून मध्य द्वीपकल्पीय भारतापर्यंत विस्तारले आहे.
ही प्रजाती यापूर्वी श्रीलंका तसेच थायलंड, नैऋत्य चीन, तैवान आणि फिलीपिन्ससह आग्नेय व पूर्व आशियातील काही भागांत आढळून आली आहे. नागपुरात सुमारे ३५६ मीटर उंचीवर तिची नोंद झाल्याने या प्रजातीच्या भौगोलिक तसेच उंचीनुसार वितरणाबाबत नवीन माहिती उपलब्ध झाली आहे.
या अभ्यासातील दुसरी महत्त्वाची नोंद Sarbanissa subflava या पतंगाची आहे. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आलेल्या दिवसा सक्रिय असलेल्या पतंगांच्या सर्वेक्षणात या प्रजातीचे तीन प्रौढ पतंग आढळले. हे पतंग अत्यंत वेगाने उडून गेल्याने त्यांचे नमुने संकलित करता आले नाहीत. मात्र, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बाह्य रचनेच्या आधारे त्यांची ओळख निश्चित करण्यात आली. Sarbanissa subflava ची भारतातील ही पहिली नोंद असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
या दोन महत्त्वपूर्ण नोंदींमुळे मध्य भारतातील पतंगांचे वैविध्य अद्याप मोठ्या प्रमाणात अभ्यासाविना असल्याचे अधोरेखित झाले आहे. भारतात यापूर्वी नोंद न झालेल्या प्रजातींचा शोध आणि Strotihypera वंशाचा दख्खनच्या पठारापर्यंत झालेला विस्तार यामुळे विदर्भाचे जैव-भौगोलिक महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
या अभ्यासातून पतंगांच्या सर्वेक्षणासाठी विविध पद्धतींचा वापर करण्याचे महत्त्वही स्पष्ट झाले आहे. S. macroplaga ची नोंद रात्रीच्या वेळी प्रकाश सापळ्याद्वारे करण्यात आली, तर S. subflava दिवसाच्या प्रकाशात आढळली. त्यामुळे केवळ एका पद्धतीवर अवलंबून न राहता रात्रीचे लाइट ट्रॅपिंग आणि दिवसाचे प्रत्यक्ष निरीक्षण अशा पूरक पद्धतींचा वापर केल्यास दुर्लक्षित आणि दुर्मिळ प्रजाती शोधण्याची शक्यता अधिक वाढते.
संशोधक राहुल भेंडे म्हणाले, “नागपुरातून Strotihypera macroplaga ची नोंद होणे ही केवळ भारतासाठी नवीन प्रजातीची नोंद नाही, तर Strotihypera या वंशाचा दख्खनच्या पठारापर्यंत विस्तार झाल्याचे महत्त्वपूर्ण निदर्शक आहे. भारतात सुमारे १३ हजार पतंगांच्या प्रजाती आहेत. पतंगांच्या व्यतिरिक्त इतर कीटकांवरही सर्वेक्षण आणि संशोधन सुरू आहे.”
“मध्य भारतातील दुर्लक्षित पतंग वैविध्याचा शोध घेण्यासाठी अजून मोठी संधी उपलब्ध आहे. विदर्भ आणि दख्खनच्या पठारात सातत्यपूर्ण सर्वेक्षण केल्यास पतंगांच्या वितरणाबाबत आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते,” असेही भेंडे यांनी सांगितले.
विदर्भ आणि दख्खनच्या पठार प्रदेशात पतंगांचे पद्धतशीर सर्वेक्षण सुरू ठेवण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. अशा सर्वेक्षणांमुळे भारतातील पतंगांचे भौगोलिक वितरण, हंगामी उपस्थिती आणि अधिवासाशी असलेला संबंध अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होणार आहे.