

नागपूर: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीपासून फारकत घेतल्याचे संकेत दिले आहेत. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच राष्ट्रवादीने आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महासचिव आभा पांडे यांनी त्यांच्या परंपरागत 'लाडपुरा-इतवारी' प्रभाग परिसरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी (दि.26) भाजपच्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भात नागपूर वगळता इतरत्र महायुती निश्चित झाल्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादीने हा पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"भाजपकडून सन्मानजनक जागांचा प्रस्ताव न आल्यास आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच स्पष्ट केली होती. याच भूमिकेचा भाग म्हणून शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा टप्पाही पार पडला आहे.
क्षांतर्गत जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या आणि निष्कलंक चारित्र्याच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महापालिकेत सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहे. महायुतीत सन्मान न मिळाल्यास सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे संकेत देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत. नागपूर महापालिकेच्या या रणधुमाळीत आता राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात जागावाटपावरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.