

नागपूर - कामठी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल यांनी काँग्रेसचे शकूर नागानी यांच्यावर अखेर निसटता विजय मिळविला आहे. 40 वर्षानंतर हे नगराध्यक्षपद भाजपकडे आले आहे. या विजयाची घोषणा होताच काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. काँग्रेस उमेदवार विजयी झालेले असताना भाजप उमेदवाराला विजय जाहीर करण्यात आल्याचा आरोप केला जात असून वातावरण तापले आहे.
विधानसभेपाठोपाठ काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार हे देखील या निकालानंतर कामठीकडे निघाले असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या विधानसभा मतदारसंघातील नगर परिषदेसाठी आज निकालाच्या निर्णायक टप्प्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये काट्याची लढत सुरू होती.
पंधराव्या फेरी अखेर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शकुर नागानी 12598 मतासह आघाडीवर तर भाजपचे अजय अग्रवाल 12380 मतासह दुसऱ्या तर बरिएमचे अजय कदम 10788 तिसऱ्या आणि अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहजा सफाहत 4755 मतांसह चौथ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे शकुर नागानी 218 मतांनी आघाडीवर होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना कामठीची जागा आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला होता तो या निमित्ताने खरा ठरला. 16 वा राऊंडमध्ये भाजप 129 मतांनी आघाडीवर आल्याने गोंधळ सुरू झाला.
बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे पराभवानंतर नेहमीचेच रडगाणे आहे. जनतेने विकासाला कौल दिला. मनपा निवडणुकीनंतर काँग्रेसची अधिक धूळधाण होईल. तो किंचित पक्ष असेल यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भर दिला. आम्ही राज्यात महायुती म्हणून मैत्रीपूर्ण लढलो यशस्वी झालो. कुठलेही मतभेद नव्हते असे सांगितले.