

नागपूर: इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील गोंधळाचा फटका गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसल्याने अनेक विमान सेवा रद्द आहेत. त्यामुळे प्रवाशांचे बेहाल आहेत. प्रवास दर अचानक वाढल्याने गेल्या काही दिवसात आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
सोमवारपासून नागपूरला सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या अनेक मंत्री, आमदार यांना देखील या हवाई संकटाचा फटका बसला आहे. अनेकांनी पुणे, मुंबई तसेच आपापल्या मतदारसंघातून नागपुरात येण्यासाठी समृद्धी महामार्गाचा आधार घेतला आहे. विधान भवन, रामगिरी, देवगिरी, आमदार निवास, सिव्हिल लाईन्स परिसर सज्ज झाला आहे. टी पॉइंट, झिरो माईल, टेकडी रोड, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स परिसरात ठीक ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात कुणालाही पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
आतापर्यंत 33 मोर्चासाठी परवानगी घेण्यात आली असून 20 सामाजिक संघटनांनी उपोषण तर 16 संघटनांनी धरणे मंडपासाठी परवानगी घेतली आहे. या अधिवेशनानंतर लागलीच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद नसताना एकजूट नसलेल्या विरोधकांना भक्कम असलेल्या महायुती सरकारशी मुकाबला करावा लागणार आहे.