

नागपूर: गोवंश तसेच गोमांसाची वाहतूक करणाऱ्या १२ जणांच्या तस्करांच्या टोळीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) कारवाई केल्याने गोवंश तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यात या प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
महाराष्ट्रात गोवंश तसेच गोमांसाची वाहतूक करताना आढळल्यास संबंधितावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
नागपूर ग्रामीणमध्ये कळमेश्वर पोलिस ठाण्यात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी डायल ११२ वर फेटरी येथे नागपूर ते काटाेल राेडवर एका ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाली. कळमेश्वर पाेलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक ट्रक जळतांना दिसला तर चालक पसार होता. पाेलिसांनी अग्निशमन दलास बाेलावून ही आग विझविली. वाहनाची तपासणी केली असता आत गोवंश होते. त्यांना दोरखंडाने बांधून निर्दयतेने आत कोंबलेले होते. ३७ पैकी २९ जनावरे आगीत होरपळून मृत्यूमुखी पडली. बचावलेल्या ८ गोवंशाला राउळगाव येथील जैन गोशाळेत दाखल करण्यात आले.
तपासात हा गुन्हा संघटितरित्या केल्याचे स्पष्ट झाले. आराेपी टाेळी प्रमुख माेहम्मद नासीर माेहम्मद शफी कुरेशी, वाहन चालक सैयद सुल्तान उर्फ सोनू हमीद अली, आमीर रउफ कुरेशी, रफीक कुरेशी शेेख सत्तार कुरेशी, जनावरे खरेदी-विक्री करून वाहतूक करणारा वाहन चालक-मालक शोहेब नौशाद सैयद, मनोहर भाेजराज मनगटे, इख्तियार कुरेशी मुश्ताक कुरेशी याच्यासह पाच फरार आराेपींविरूद्ध माेक्का लावण्यात आला आहे. जनावर वाहतुकीसाठी टाेळी प्रमुख माेहम्मद नासीर माेहम्मद शफी कुरेशी याच्याकडे ट्रक आहे.