

नागपूर : १६ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर येथील अड्याळी गावातील राहुल पटले यांना घरालगतच्या झाडावर तपकिरी रंगाचा मोठा साप दिसून आला. ही माहिती त्वरित ‘हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, नागपूर’चे सर्पमित्र प्रतीक धवड यांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. मोठ्या शिताफीने त्यांनी सापाला सुरक्षित पकडून (रेस्क्यू करून) नागरिकांच्या मनातील भीती दूर केली.
‘फॉस्टेन्स कॅट स्नेक’ (Boiga forsteni) हा मोठ्या आकाराचा, झाडांवर राहणारा आणि मागील बाजूस विषदंत असलेला निमविषारी (Rear-fanged mildly venomous) साप आहे. हा Boiga वंशातील तुलनेने मोठा साप मानला जातो.
या सापाचे शरीर लांब व दोन्ही बाजूने काहीसे चपटे असते. डोके मानेपेक्षा स्पष्टपणे रुंद, तर डोळ्यांची बाहुली मांजरासारखी उभी असते. डोळ्यांच्या मागून तोंडाच्या दिशेने गडद पट्टी असते. शरीरावर काळे-तपकिरी रंगाचे ठिपके किंवा चौकटीसारखी नक्षी (Checkered pattern) असते. तसेच काही साप लालसर-तपकिरी, पिवळसर किंवा करड्या रंगाचे आढळतात.
वन्यजीव संरक्षण कायद्यातील नवीन सुधारणेनुसार (Wildlife Protection Amendment Act, 2022), ‘फॉस्टेन्स कॅट स्नेक’चा समावेश आता अनुसूची २ (Schedule II) मध्ये करण्यात आला आहे.
हा साप निशाचर असून सरडे, लहान पक्षी व वटवाघळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा साप एप्रिल ते जून दरम्यान सुमारे १० पर्यंत अंडी घालतो. दरम्यान, या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे निसर्गमुक्त करण्यात आले.