Nagpur News | लोकशाही वाचवा – अराजकता हटवा! भारतीय जनता पार्टीच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान देशव्यापी अभियान

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पदयात्रा
BJP
BJP pudhari photo
Published on: 
Updated on: 

नागपूर - लोकशाही संस्था, संविधानिक प्रक्रिया आणि मतदार यादीची शुद्धता याबाबत जनजागृती करण्यासह विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या कथित दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशव्यापी 'लोकशाही वाचवा – अराजकता हटवा' अभियान राबविण्यात येत आहे. २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात विविध जनजागृती, संवाद, पदयात्रा, पत्रकार परिषदा आणि युवा सहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.सांगता ५ नोव्हेंबर रोजी नागपुरात भव्य पदयात्रेने होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आयोजित या पदयात्रेत सुमारे १५ ते २० हजार नागरिक सहभागी होतील.यशवंत स्टेडियम येथून सुरू होणारी ही पदयात्रा संविधान चौक येथे पोहोचेल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने या अभियानाची सांगता होणार आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश मतदार यादीची शुद्धता आणि पारदर्शकता याबाबत जनजागृती करणे, मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (SIR) योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.अलीकडच्या काळात निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांकडून विविध आंदोलने आणि आरोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया, संवैधानिक संस्था आणि लोकशाही व्यवस्थेबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा या अभियानाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून विरोधकांच्या राजकीय भूमिकेतील विसंगती, लोकशाही आणि संविधानाबाबतचा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन तसेच विविध मुद्द्यांवरील दुहेरी भूमिका जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.

प्रत्येक महानगरात २ ते ३ पदयात्रा आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयात किमान एक पदयात्रा आयोजित करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक पदयात्रेत सुमारे १० हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पदयात्रांच्या माध्यमातून मतदार यादीची शुद्धता, SIR प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांच्या विश्वासार्हतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

देशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्र चिंतन संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमात सुमारे २०० निवडक बुद्धिजीवी, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे.या संवादामध्ये SIR प्रक्रिया, मतदार यादीतील बदल, मतदार यादीची शुद्धता, अवैध घुसखोरी आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व या विषयांवर चर्चा होईल. वरिष्ठ नेते आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची तसेच प्रश्न विचारण्याची संधी सहभागी मान्यवरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी SIR प्रक्रियेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवून राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्याचे नियोजन आहे.

विद्यार्थी आणि युवकांना लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, नागरिकत्व, SIR आणि संविधानिक मूल्यांची माहिती देण्यासाठी विशेष युवा संवाद आयोजित करण्यात येणार आहेत. देशभरातील निवडक महाविद्यालये, विद्यापीठे, ITI संस्था आणि कोचिंग सेंटरमध्ये संवादात्मक कार्यक्रम आणि प्रश्नोत्तर सत्रे आयोजित केली जातील.या उपक्रमाच्या माध्यमातून २ हजार कार्यक्रमांद्वारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी, युवक आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या संवादामध्ये विद्यार्थ्यांच्या शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्याबरोबरच विकसित भारत, राष्ट्रीय विकास, वैज्ञानिक प्रगती आणि नागरिकांची जबाबदारी या विषयांवरही चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, लोकशाही, राष्ट्रीय विकास आणि नागरिक कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरात २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीची शुद्धता, पात्र नागरिकांचे मतदानाचे अधिकार तसेच लोकशाही आणि संविधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

२ नोव्हेंबर रोजी नागपुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी वसंतराव देशपांडे सभागृहात नागपुरातील प्रबुद्ध नागरिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात लोकशाहीचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि विरोधाच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या अराजकतेच्या प्रवृत्तीवर विचारमंथन करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी चिटणवीस मैदान येथे सुमारे पाच हजार युवकांच्या सहभागातून ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली यावेळी मंचावर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीता ताई ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार परिणय फूके, आमदार संजय भेंडे, सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर, भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, महामंत्री रितेश गावंडे, संपर्क महामंत्री विष्णू चांगदे,जयप्रकाश जी गुप्ता, अर्चना डेहनकर, पवन तिवारी, वैभव बावनकर इत्यादी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.